टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 31 मे 2021 – कोरोनामुळे अनेक उद्योग, व्यवसाय आणि व्यापार ठप्प झाले. अनेकांच्या कंपन्या बंद पडण्याच्या अवस्थेत गेल्या. अशा काळातच देशात 12,554 कंपन्यांची नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 2292 कंपन्यांची नोंद झाली असून त्यापाठोपाठ दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागत आहे. लोकांनी कोरोना महामारीकडे संधीच्या रूपात पाहून कंपन्या उघडण्याची हिंमत दाखविल्याचे यावरून स्पष्ट होतंय.
कंपनी व्यवहार मंत्रालयाने कंपन्यांच्या नोंदणीची आकडेवारी जाहीर केलीय. त्यानुसार एप्रिलमध्ये देशभरात विक्रमी 12,554 कंपन्यांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने सुरू केलेल्या 839 कंपन्यांचा समावेश आहे.
तसेच 12,482 कंपन्यांची लिमिटेडच्या रूपात नोंदणी झालीय. या सर्व कंपन्यांचे अधिकृत भांडवल 1483.41 कोटी रुपये इतके आहे. देशात 30 एप्रिलपर्यंत 13 लाख 55 हजार कंपन्या ऑक्टिव्ह आहेत.
एप्रिल महिन्यात कोरोनाने कहर केला होता. रुग्णसंख्या आणि मृत्युदर दोन्ही चिंताजनक पातळीवर होते. अशा वातावरणात देशातील कॉर्पेरेट क्षेत्र डगमगले नाही. अनेक लोकांनी कोरोना महामारीकडे संधी म्हणून पाहत नव्या कंपन्यांची नोंदणी केलीय. भारतीयांची उद्योजक बनण्याची भावना वाढल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
सर्वाधिक नोंदणी सेवा क्षेत्रात :
एप्रिलमध्ये व्यवसायांच्या वर्गवारीनुसार, सेवा क्षेत्रात सर्वाधिक 3442 कंपन्यांची नोंदणी झालीय. त्या खालोखाल मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रांचा क्रमांक लागला आहे. बिझनेस सर्व्हिसेजमध्ये माहिती तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास तसेच लॉ, ऑडिट, अकाऊंट्ससंबंधी कामांचा समावेश आहे.
हि आहेत. टॉप 3 राज्यांतील नव्या कंपन्या :
महाराष्ट्र – 2292 इतकी नोंद
उत्तर प्रदेश – 1260 इतकी नोंद
दिल्ली – 1262 इतकी नोंद
30 एप्रिलपर्यंत देशातील एकूण कंपन्यांची संख्या 21 लाख 63 हजार 829 वर गेली आहे. यात 7 लाख 59 हजार 572 कंपन्या बंद झाल्यात. तसेच 2274 कंपन्या निष्क्रिय असून 6906 कंपन्या दिवाळखोरीत गेल्यात. त्यासह 39,572 कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या 18 महिन्यांत 2 लाख 19 हजार 559 कंपन्यांची नोंदणी झालीय.