TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 31 मे 2021 – जगात सध्या थैमान घातलेल्या कोरोनाची उत्पत्ती नेमकी कोठे झाली? याची उत्सुकता अनेकांना होती. मात्र, जागतिक स्तरावरील वेगवेगळ्या बाबी सांगितल्या जात होत्या. आता मात्र, कोरोनाची निर्मिती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतच झाली आहे. केवळ वटवाघळाचा बहाणा केला गेला आहे, असा दावा नव्या संशोधनात केला आहे.

वुहानमधील काही कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2019 मध्ये रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी एका अहवालात केला आहे.

त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या उत्पत्तीबाबत तपास करण्याचा आग्रह धरला. जगभरातील अनेक देशांनी त्याला पाठिंबा दिला. अमेरिकेतील आरोग्य यंत्रणेने या संशोधनासाठी गुंतवणूक केल्याचा आरोपही चीनने केला आहे.

या पार्श्वभूमीवर, चीनच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेतच तयार केला आहे. रिव्हर्स इंजिनीअरिंगच्या सहाय्याने तो वटवाघळांपासून निर्माण झाल्याचे दाखवल्याचा दावा एका नव्या संशोधनात केला आहे. त्यामुळे चीनविरुद्धच्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे.

ब्रिटिश प्राध्यापक एंगस आणि नॉर्वेतील शास्त्रज्ञ डॉ. बर्जर यांनी हे संशोधन केलं कि, मागील वर्षी हे दोन्ही शास्त्रज्ञ कोरोना विषाणूवरील लस तयार करण्यासाठी संशोधन करत होते. तेव्हा त्यांना या विषाणूमधील काही युनिक फिंगरप्रिंट सापडले.

प्रयोगशाळेत विषाणू तयार केल्यास असे युनिक फिंगरप्रिंट आढळतात. त्यावेळी या संशोधकांनी हे संशोधन प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक मोठ्या संस्थांनी याला नकार दिला.

गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ जगभरात थैमान घातलेल्या आणि लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गाला चीनमधील वुहानमधून सुरुवात झाली, हे सर्वांनाच माहित आहे. चीनने हा विषाणू वटवाघळातून माणसात आल्याचे सांगितलं आहे.

चीनने प्रयोगशाळेत याची निर्मिती केल्याचा संशय सुरवातीपासून व्यक्त केला जात होता. आता हा कोरोनाचा विषाणू नैसर्गिक नसून वुहानमधील प्रयोगशाळेतच तयार केला असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे चीनकडे संशयास्पद पहिले जात आहे.