TOD Marathi

‘नमाज’साठी मशिदीत जाता येणार नाही!; ‘रमजान ईद’निमित्त गृह विभागाची सूचना, कोरोनामुळे यंदा ईद घरीच

टिओडी मराठी, मुंबई, दि. 12 मे 2021 – वाढत्या कोरोनामुळे ‘रमजान ईद’निमित्त गृह विभागाने काही मार्गदर्शक सूचनांचं त्यांनी पालन करणं बंधनकारक आहे, असे सांगून ‘नमाज पठण’साठी मशिदीत जाता येणार नाही, असे म्हंटले आहे. कोरोना रोखण्यासाठी एकत्र जमण्यास परवानगी नाही. त्यामुळे यंदा मुस्लीम बांधवांना देखील रमजान ईद घरच्याघरीच साजरी करावी लागणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ब्रेक द चेन’ या मोहीमेअंतर्गत राज्यभरात कडक निर्बंध लागू केले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी आणि संचारबंदी असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे राज्यात गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाची कोणताही सण भव्य दिव्य पद्धतीने साजरा करता येणार नाही. त्यामुळे यंदा मुस्लीम बांधवांना देखील रमजान ईद घरच्याघरीच साजरी करावी लागणार आहे.

मशिदीत किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांना नमाज पठणासाठी एकत्र जमण्यास परवानगी नाकारली आहे. शिवाय इतरही काही मार्गदर्शक सूचनांचं त्यांनी पालन करणं बंधनकारक असणार आहे, असेही गृह विभागाने सांगितले आहे.

यंदा 13 एप्रिल 2021 पासुन मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली आहे. 13 किंवा 14 मे 2021 (चंद्रदर्शनावर अवलंबून) रोजी रमजान ईद (इद उल फित्र) साजरी केली जाणार आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात अतिसंसर्गजन्य परिस्थिती आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता शासनाने 13 एप्रिल 2021 रोजी जाहीर केलेल्या आदेशांचे पालन रमजान ईद रोजीही करणे अनिवार्य राहील. त्यानुसार रमजान ईदच्या निमित्ताने गृह विभागामार्फत काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

1. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करीता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम घरातच साजरे करुन ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करावे.

2. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र जमू नये.

3. रमजान ईद निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेने तसेच स्थानिक प्रशासनाने साहित्य खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले आहे. त्याचे तंतोतंत पालन करावे. त्यावेळे व्यतिरिक्त बाजारात समान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

4. कोरोनाच्या या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत. तसेच नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये.

5. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करू नये.

6. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी.

7. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घ्यावी.

8 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे हि अनुपालन करावे.