काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. एनआयए कोर्टाने आज यासिन मलिकला शिक्षा सुनावली. यासिन मलिक याने याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनआयए विशेष कोर्टाने 19 मे रोजी त्याला दोषी ठरवले होते. आज एनआयए कोर्टात शिक्षेवर सुनावणी झाली. एनआयएने यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेच्या मागणी केली होती. यासिन मलिकविरोधात देशविरोधी कारवायाचा आरोप होता. मलिक विरोधात ‘युएपीए’ कायद्यातील कलमांसह इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत.
यासिन मलिकने जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नावाखाली जगभरातून बेकायदेशीर आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारला असल्याचे कोर्टाने याआधी म्हटले होते. कोर्टाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता फारुख अहमद उर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसुफ शाह, आफताब अहमद शाह, नयीम खान, मोहम्मद अकबर खंडय, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, झहूर अहमद शाह वातली, शबीर अहमद शाह, नवल किशोर कपूर आदींविरोधात आरोप निश्चित केले आहेत. त्याशिवाय लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेचा म्होरक्या सल्लाउद्दीन विरोधातही आरोप निश्चित केले आहेत.