TOD Marathi

मुंबई:
शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत उद्या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच त्यांच्याबरोबर कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक आणि जिल्हाप्रमुख संजय पवार हे देखील अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उद्या अर्ज भरणार असल्याने पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची सदिच्छा भेट घेतल्याचं राऊत यांनी सांगितलं. तसेच सेनेच्या दोन्ही उमेदवारांमागे महाविकास आघाडी भक्कमपणे असल्याने दोन्ही उमेदवार गुलाल उधळतील, अशी ग्वाहीही शरद पवारांनी दिल्याचं राऊत यांनी सांगितलं.

उद्या मी अर्ज भरणार आहे. त्याआधी पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीच्या अनुशंगाने शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. शिवसेनेचा सहावा उमेदवार विजयी होईल यावर शरद पवार ठाम आहेत, असंही राऊत यांनी सांगितलं.

शरद पवार हे राज्याचं तसेच देशाचं एक उत्तुंग नेतृत्व आहे. या सरकारचा ते आधारस्तंभ आहेत. वडीलधारी आहेत. त्यांचा आशीर्वाद घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यानिमित्ताने अनेक विषयांवर चर्चा झाली. बऱ्याच वेळ आम्ही विविध विषयांवर चर्चा केली”.

“शिवसेनेचा सहावा उमेदवार विजयी होईल यावर शरद पवार ठाम आहेत. त्याबाबतची सगळी तयारी होतीये. पण भाजपने जरी राज्यसभा बिनविरोध न करता निवडणुकीची तयारी केली तर आमचीही तयारी आहे. घोडेबजार होऊ नये, भाजपने घोडेबजाराला उत्तेजन देऊ नये, या मताचे आम्ही सगळे आहोत. पण जर घोडेबाजार करत असेल तर ती त्यांची इच्छा. कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याची इच्छा आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची भूमिका ठरली आहे. महाविकास आघाडीतील सगळे पक्ष आणि अपक्ष सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या पाठीशी आहेत”, असं राऊत यांनी सांगितलं.

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.