TOD Marathi

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर (MLC Amol Mitkari) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड (Shiva Mohod) यांनी गंभीर आरोप केले होते. अकोल्यातील पक्षांतर्गत हा वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil Akola) यांच्यासमोरच आमदार अमोल मिटकरींवर कमिशन घेत असल्याचे गंभीर आरोप केले होते. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावर आमदार अमोल मिटकरींनी मोहोड यांच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. शिवा मोहोड यांच्यावर त्यांच्याच संस्थेतील एका सहायक शिक्षिकेने छळवणुकीचे आरोप केले आहेत. शिक्षिका मीना चव्हाण यांनी आरोप केलाय की, मोहोड यांनी आदिवासी असल्याने छळवणूक केली. शिक्षिकेच्या तक्रारीनंतर शिवा मोहोड यांच्यावर अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या गुन्ह्याला स्थगिती दिल्याची माहिती शिवा मोहोड यांनी दिली आहे.

शिक्षिका मीना चव्हाण यांचे आरोप काय?
शिवा मोहोड यांनी आपण आदिवासी असल्यानं छळवणूक केल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे तसेच नोकरी वाचविण्यासाठी मोहोड यांनी पैसे मागितले,
वर्गाबाहेर, शाळेबाहेर उभं करणं, अंगावर धावून जाण्याचे प्रकार शिवा मोहोड यांनी केलां.
शिक्षिका मिना चव्हाण यांना मागच्या महिन्यात मोहोड यांच्या संस्थेनं शाळेतून बडतर्फ केलंय.
शिवा मोहोड यांच्यापासून आपल्याला आणि कुटूंबाला धोका असल्याची शिक्षिकेची तक्रार आहे.

शिवा मोहोड यांचं उत्तर काय?
सदर शिक्षिका शाळेत सातत्याने शाळेत गैरहजर असल्यानं तिला संस्थेच्या संचालक मंडळानं बडतर्फ केलं.
सदर शिक्षिकेच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या अॅट्रोसिटीच्या गुन्ह्याला उच्च न्यायालयातून स्थगिती मिळाली. आपण आमदार मिटकरींवर आरोप केल्यानंतरच हे प्रकरण समोर का आलं? हे जुनं प्रकरण आहे.
माझ्या घराकडे माणसं पाठवली जात आहेत. माझ्या गाडीचा पाठलाग होतोय. मात्र, मी शांत बसणार नाहीय. दहा दिवसांनी जो हे घडवतोय त्याच्याविरूद्धचे पुरावे देणार, असं सांगत त्यांनी नाव न घेता आमदार मिटकरींना परत इशारा दिलाय.