TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 26 जून 2021 – दिल्लीमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांची झालेली बैठक ही शेतकरी आंदोलनासंबंधी होती. आम्ही काही आघाडी म्हणून बसलो नाही. जे काही करायचे ते काँग्रेसला बरोबर घेऊन करू, असेच माझे मत असून, ते जाहीर केलं आहे. आघाडीच्या नेतृत्वाबद्दल चर्चा झाली नाही. सामुदायिक नेतृत्व हवे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

मराठा आरक्षणावर बोलताना शरद पवार म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य आणि केंद्राने समन्वयाने सोडवणे आवश्यक आहे. आरक्षणासंबंधीचे अधिकार केंद्राच्या अखत्यारित आहेत. केंद्राने यासाठी पुढाकार घ्यावा, राज्य सरकार व मराठा संघटना यांच्यात संवाद सुरू आहे. त्यातून मराठा समाजातील समस्या सोडविणार आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय राज्याने घेतला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला. राज्य सरकार पुन्हा एकदा न्यायालयात जाणार असून लवकरच हा प्रश्न सुटेल, अशी आशा आहे.

सर्व विरोधकांना एकत्र आणून तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व शरद पवार करणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, शरद पवार यांनी असे बरेच उद्योग केलेत. आता मार्गदर्शन, सल्ला देणे हे काम करणार आहे. मी नव्या पर्यायाला बळ देण्याचे काम करणार आहे.

काँग्रेसने घेतलेल्या स्वबळाच्या भूमिकेचे स्वागत शरद पवार यांनी केले. याबाबत पवार म्हणाले, प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःची संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल आमची काही तक्रार नाही.

आपल्या कार्यकर्त्यांची उमेद वाढावी, यासाठी आम्ही सगळे बोलत असतो. त्यासाठी काँग्रेस असे काही प्रयत्न करत असेल, तर त्यांचं आम्ही स्वागत करतो, हा प्रयत्न त्यांनी अवश्य करावा.