TOD Marathi

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शरद पवार बोलत होते, सत्तेचा वापर कसा करायचा हे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून शिकले पाहिजे, असे मोठे वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे.

पवार म्हणाले, मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो कारण मला नितीन गडकरी अहमदनगरमध्ये गेल्या अनेक काळापासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडवणाऱ्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करणार असल्याचं मला सांगण्यात आलं. तसंच मी उपस्थित राहावं अशी त्यांची इच्छा होती, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

देशात यापुढे नवीन साखर कारखान्यांना परवानगी नको तसेच लवकरच संपूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे धोरण स्वीकारले जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. तर साखर कारखान्यांनी इथेनॉलपासून हायड्रोजन गॅसच्या निर्मितीत उतरावे असा सल्ला शरद पवार यांनी या वेळी दिला. देशात पेट्रोलमध्ये सध्या २० टक्के इथेनॉलच्या वापरास परवानगी दिली आहे. आता पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे धोरण स्वीकारले पाहिजे. येत्या दोन महिन्यांत त्या संदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.