TOD Marathi

मुंबई: गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या शाळेतल्या दिवसांची आठवण सांगितली. ते म्हणाले, मला माझे शाळेतले दिवस आठवत आहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचे दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे.

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होते आणि आहे. मुलं नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. शाळेचे नाही तर आज आपण मुलांच्या भविष्याचं, विकासाचं, प्रगतीचं दार उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

शिक्षकांना कधीही आरोग्याबाबत शंका आली तर त्यांनी कोरोना चाचणी करणे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. शिक्षणाची जागा, वर्ग बंदिस्त नसायला हवे, ते उघडे असायला हवे. दारं, खिडक्या उघड्या असायला हव्या, तसेच सोशल डिस्टंगिंचे पालन करणे, स्वच्छता राखणे देखील महत्वाचे आहे, अशा सूचना त्यांनी शिक्षकांना दिल्या आहेत.