TOD Marathi

नागपूर: ओबीसी अध्यादेशामुळे लांबणीवर पडलेल्या धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. आता येत्या ५ ऑक्टोबरला मतदान होणार असून ६ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने निवडणूक आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला होता.

राज्यातील पाच जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या पोटनिवडणुकींसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या प्रचारात दिग्गज नेते उतरले आहेत. आज म्हणजे दिनांक ३ ऑक्टोबर रोजी रात्री दहापर्यंत प्रचार करण्याच्या सुचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस प्रचाराचा शेवटचा दिवस ठरणार आहे.

नागपुरमधील सावनेर मतदार संघाचे आमदार आणि दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका होती. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. या प्रचारात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली होती.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते परंतु कोविड आणि ओबीसी अध्यादेशामुळे स्थगित करण्याबाबत राज्य सरकारने निवडणूक आयोगाला विनंती केली होती, त्यामुळे ९ जुलै रोजीच्या या निवडणुका स्थगित केल्या होत्या. त्यानंतर ९ सप्टेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावनीत पोटनिवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने दिलेले कारण योग्य नसल्याचा निर्वाळा देत निवडणूक आयोगाने तत्काळ निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने ५ ऑक्टोबर रोजीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे.