दुबई: विराट कोहलीने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतला कर्णधारपदाचा शेवटचा सामना सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध खेळला. या आयपीएल हंगामानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचं विराट कोहलीने यापूर्वीच जाहीर केले होतं. मात्र यावर भारतीय क्रिकेट संघाचा नेहमीचा टीकाकार मायकल वॉन याने मात्र विधान करत विराटला अपयशी कर्णधार म्हटलं आहे.
वॉनने एका मध्यमाशी बोलताना सांगितलं, विराट एक कर्णधार म्हणून भारतीय संघ आणि आरसीबी या दोघांसाठी मर्यादीत ओव्हर्सच्या सामन्यात अधिक यश मिळवू शकला नाही. मागील काही काळात आरसीबी संघात उत्तम खेळाडू आले आहेत. यंदाही मॅक्सवेल, हर्षल पटेल यांनी अप्रतिम खेळ केला तरीही आरसीबी खिताबापासून दूर राहिली. त्यामुळे विराट स्वत:ला एक अपयशी कर्णधार मानेल, अशा शब्दात त्याने टीका केली आहे.
विराट कोहली सामन्यानंतर म्हणाला, मी संघात अशी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यात तरुण खेळाडू येऊन आक्रमक खेळ दाखवू शकतील. मी भारतीय संघासाठीसुद्धा तेच करण्याचा प्रयत्न केला. मी फक्त एवढेच म्हणेन की मी माझ्याकडून १२० टक्के संघाला दिले आणि यापुढेही खेळाडू म्हणून देत राहीन.