TOD Marathi

श्रावण महिन्यात फळ आणि भाजाच्या वाढलेल्या मागणीमुळे गेल्या काही दिवसांपासून दरात वाढ झाली आहे. (Vegetable Prize hike in last few days) किरकोळ बाजारात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. किरकोळ बाजारात भाज्यांची ४० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे तर दुसरीकडे फळांचे दरही २० टक्क्यांनी वाढले आहेत. पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्याचे भावसुद्धा गगनाला भिडले आहेत.

राज्याच्या वेगवेगळ्या भागात गेल्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मागणी वाढली असताना बाजारात भाज्यांची आवक घटली आहे.

पाऊस, वाहतूक कोंडी यामुळे आधीच भाजीपाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागतो, इंधन जास्त लागतं. श्रावण महिना (Shravan Month) सुरू झाल्याने गावरान आणि रान भाज्यांना सर्वाधिक पसंती देत आहेत. मात्र रानभाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर वधारले आहेत, असे भाजी विक्रेत्यांचे मत आहे.

ठोक बाजारात भाज्यांचे दर १० ते २० टक्क्यांनी तर किरकोळ बाजारात ४० टक्क्यांनी वाढले आहेत. किरकोळ बाजारात भेंडी, गवार, शिमला मिरची या भाज्यांचे दरांनी शंभरी पार केली आहे.