TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 21 जून 2021 – केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे देशात सोमवारी (दि. 21 जून) पासून 18 ते 44 वयोगटासाठी मोफत लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, गर्दी टाळण्यासाठी मुंबईत 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाचे 18 ते 29 आणि 30 ते 44 असे गट केले आहेत. सोमवारी (दि. 21 जून) पासून केवळ 30 ते 44 वयोगटासाठी पालिका-राज्य सरकारच्या 149 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. यातील 50 टक्के लसीकरण वॉक इन तर 50 टक्के नोंदणी पद्धतीने होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलीय. तिसऱया टप्प्यातील 18 ते 44 हा वयोगट हा सर्वात मोठय़ा लोकसंख्येचा टप्पा आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका मेहनत घेत आहे. कोरोना चाचण्या व लसीकरणावर भर दिला जात आहे. खासगी रुग्णालये व त्यांच्या लसीकरण केंद्रांत शुल्क आकारून लसीकरण सुरूय. मात्र, लसीच्या तुटवडय़ामुळे सुरू केलेले 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण बंद ठेवले होते. पण, आता महिनाभराच्या ब्रेकनंतर मोफत लसीकरण सुरू होणार आहे.

मात्र, या गटातील लोकसंख्या अधिक असल्यामुळे या लसीकरण मोहिमेचे दोन गट केले आहेत. पहिल्या गटात 18 ते 29 वयाच्या व्यक्ती तर दुसऱया गटात 30 ते 44 वयोगटातील व्यक्ती असणार आहेत. सोमवारपासून 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे.

मुंबईत 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू केले होते. मात्र, लसीच्या तुटवडय़ामुळे सुमारे महिनाभराच्या ब्रेकनंतर सोमवार (दि. 21 जून)पासून 18 ते 44 वयोगटातील 30 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला रविवारी 1 लाख 11 हजार लस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील 18 ते 44 या गटाचे लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. मात्र, खासगी रुग्णालये व त्यांच्याकडून सुरू केलेल्या लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील सशुल्क लसीकरण सुरू आहे.