TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 21 जून 2021 – नवी मुंबई विमानतळ स्वतंत्र विमानतळ नाही. हा मुंबई विमानतळाचा एक विस्तार आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव असले पाहिजे, असे सांगताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव दिले असते, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. विमानतळ नामांतराच्या वादात राज ठाकरे यांची उडी घेतली आहे, असे समजत आहे.

राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर आता राज्य सरकार काय भूमिका घेणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कृती समितीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर चर्चा केलीय. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाबाबतची वस्तुस्थिती मांडली.

आमदार प्रशांत ठाकूर माझ्याकडे येऊन गेले. नवीन होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची त्यांची मागणी होत आहे. सरकारची भूमिका बाळासाहेबांचे नाव देण्याची आहे. त्याच्यातून हा संघर्ष सुरुयहे. मोर्चे, धरणे सुरु आहेत. माझा पाठिंबा घेण्यासाठी ते आले होते.

मी वस्तूस्थिती समोर मांडली आहे. कोणतंही विमानतळ येतं, ते शहराबाहेर येतं. तेव्हाची मुंबई पकडली तर ते विमानतळ सांताक्रूझला गेलं. त्यावेळी मुंबई विकसित झालेली नव्हती. मग, वाढवत ते सहारपर्यंत गेलं आणि मग त्याला सांताक्रुझ विमानतळ आणि सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव दिलंय, असे राज म्हणाले.

मागे जेव्हा असे विमानतळ बनवायचे ठरले. तेव्हा जीव्हेके कंपनीला मी विचारले, हे कसले विमानतळ आहे? त्यावर आताचे विमानतळ आहे ते डोमेस्टिक असेल, आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय असणार आहे.

आता जे विमानतळ नवी मुंबईमध्ये होत असलं तरी ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ होणार आहे. त्यासाठी शिवडी-न्हावाशेव रोड होणार आहे. ते मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव राहणार आहे, असे कंपनीने मला सांगितलं होतं, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

इथे जागा नसल्यामुळे नवी मुंबईत विमानतळ होत आहे. त्यामुळे त्या विमानतळालाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असेल, असं मला वाटतं. या विमानतळाला आणखी 5 वर्ष लागतील.

नामकरणाचा हा वाद जाणीवपूर्वक होतोय की नाही? याची मला कल्पना नाही. पण, आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव राहणार आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनीही विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं, असे त्यांनी स्पष्ट केलंय.

नवी मुंबईतील विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव दिले तर आमचा विषयच संपला. आम्ही महाराजांच्या नावाला विरोध करणार नाही, असे कृती समितीने स्पष्ट केलं आहे, असे राज ठाकरे म्हणाले. शिवाजी महाराजांच्या नावावर वाद कसा होऊ शकतो?, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.