टिओडी मराठी, कोलकाता, दि. 21 जुलै 2021 – जोपर्यंत भाजपला सत्तेतून बाहेर करत नाही, तोपर्यंत देशात ‘खेला होबे’ असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. ममता बॅनर्जी ह्या आज शहीद दिवस साजरा करत आहेत. टीएमसी पक्षाच्या निर्मितीपासून दरवर्षी 21 जुलैला शहीद दिवस साजरा केला जातोय. यानिमित्त ममता बॅनर्जी यांनी आज व्हर्च्युअलीच संबोधन केले. ममता म्हणाल्या भाजपने देशाला अंधकारात नेले आहे.
मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, बंगालच्या जनतेने ‘मा, माटी आणि मानुष’ची निवड केलीय. त्यांनी अर्थशक्तीला नाकारले आहे. भाजप हुकूमशाहीवर उतरला आहे. त्रिपुरामध्ये आमचा कार्यक्रम रोखला गेला, हीच लोकशाही आहे का? ते देशातील संस्था नष्ट करताहेत. मोदी सरकारला प्लास्टर करण्याची गरज आहे. आता आपल्याला काम सुरू करायचे आहे.
ममता बॅनर्जी यांनी पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरूनही मोदी सरकारवर निशाणा साधत त्या म्हणाल्या, केंद्र सरकार पेगाससच्या माध्यमाने हेरगिरी करत आहे. हेरगिरीसाठी पैसे खर्च करत आहे. यात मंत्री आणि न्यायाधिशांचे नंबर आहेत. मात्र, याचा आम्हाला काही फरक पडत नाही.
भाजपला सत्तेतून बाहेर करेपर्यंत ‘खेला होबे’ :
यावेळी ममता म्हणाल्या, मतदानानंतर राज्यात कसल्याही प्रकारचा हिंसाचार झालेला नाही. मतदानाच्या बरोबर अगोदर ते आमच्यावर कशाप्रकारे दबाव टाकत होते ?, आम्हाला माहीत आहे. आता जोवर भाजपला सत्तेतून काढत नाही, तोवर ‘खेला होबे’. 16 ऑगस्टला खेला दिवस साजरा करणार आहे.