TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ल्ली, दि. 13 मे 2021 – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात हाहा:कार माजवला आहे. महिनाभरापासून दररोज तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. ऑक्सीजन, औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज देशातील परिस्थितीचा आढवा घेताहेत. संबधित राज्यांना सूचना करत आहेत. देशातील सर्व सरकारी यंत्रणा कोरोना विरोधात लढत आहे. याच काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे काम कुठे दिसेना झाले आहे. तसेच या कोरोना काळात गृहमंत्री अमित शाह हरवले आहेत, अशी तक्रार दिल्ली पोलिसांत केली आहे.

राष्ट्रीय स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी बुधवारी अमित शाह हरवले आहेत, अशी तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल केली आहे. या तक्रारीविषयी बोलताना करियप्पा म्हणाले, ‘कोरोनाच्या काळामध्ये राजकीय नेत्यांनी देशाची सेवा करणे, लोकाच्या समस्या सोडविणे अपेक्षित आहे. अशा काळात या जबाबदारीपासून पळू जाऊ नये.’

तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी नागेश करियप्पा यांची चौकशी करण्यासाठी एनएसयुआय (NSUI) च्या कार्यालयात आले. असा दावा एनएसयुआय (NSUI) चे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते लोकेश चुघ यांनी केलाय. ते म्हणाले की, ‘२०१३ पर्यंत राजकारणी नागरिकांप्रती जबाबदार होते. पण, त्यानंतर भाजपचे सरकार आल्यानंतर हे चित्र पूर्ण बदलले. आता पंतप्रधानानंतर सर्वात महत्वाची व्यक्ती असलेले गृहमंत्री कोरोनाच्या काळात हरवले आहेत. ‘