TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 13 मे 2021 – पुणे जिल्ह्यातील 626 कोविड रुग्णालयांना आज 6 हजार 530 रेमडेसिविर इंजेक्‍शनसचा पुरवठा केला आहे. जर संबंधित हॉस्पिटलने रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्‍शन विकत आणण्यासाठी प्रीस्क्रिप्शन/ चिठ्ठी दिल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्‍शनसतुटवडा भासू नये, आणि या कोरोना काळात कोणत्याही प्रकारे रुग्णावर इंजेक्‍शनस नाही म्हणून उपचार थांबू नये, म्हणून पुणे जिल्ह्यातील 626 कोविड रुग्णालयांतील 16 हजार 293 फंक्‍शनल बेडच्या प्रमाणात आज 6 हजार 530 रेमडेसिविर इंजेक्‍शनसचा पुरवठा केला आहे. दररोज प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे सर्व रुग्णालयांना त्यांचे बेड्‌सच्या प्रमाणात औषध पुरवठा केला जात आहे.

हॉस्पिटलमार्फत रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्‍शन विकत आणण्यासाठी चिठ्ठी दिली जाते. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होते. हे रेमडेसिविर इंजेक्‍शन सध्या बाजारात उपलब्ध नाही. परंतु रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्‍शन विकत आणण्यासाठी प्रीस्क्रिप्शन दिल्यामुळे त्याचा काळाबाजार होण्यास चालना मिळत आहे, असे आढळले आहे.

त्यामुळे कोणत्याही हॉस्पिटलने रुग्णांच्या नातेवाइकांना तशी (रेमडेसिविर इंजेक्‍शनची) चिठ्ठी देऊ नये. अशी बाब आढळून आल्यास संबंधित हॉस्पिटलला केला जाणारा रेमडेसिविर इंजेक्‍शनचा पुरवठा थांबविण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिला आहे.