टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 11 मे 2021 – जगात कोरोनाने कहर केला असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केलीय. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन कोटींहून अधिक झालीय. कोरोनाशी लढण्यासाठी आता सोशल मीडियामधील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ट्विटरने देखील भारताला मदतीचा हात पुढे करून सुमारे 110 कोटींची मदत केली आहे.
या कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी मोजकेच नेते पुढे आल्याचे आढळत आहे.
मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने कोरोनाशी लढण्यासाठी पुढाकार घेतलाय. ट्विटरने 15 मिलियन डॉलर्स म्हणजेच 110 कोटींची मदत जाहीर केलीय. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डोर्सी यांनी सोमवारी ट्विट करून याबाबत माहिती दिलीय.
‘ही रक्कम केअर, एड इंडिया आणि सेवा इंटरनेशनल यूएसए या तीन संस्थांना दान केली आहे. यात केअरला 1 कोटी डॉलर्स तर एड इंडिया आणि सेवा इंटरनॅशनल यूएसएला अडीच मिलियन डॉलर्स दिले आहेत’ असं म्हटलंय.
ट्विटरने आपल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, सेवा आंतरराष्ट्रीय ही हिंदू विश्वास-आधारित, मानवतावादी, ना-नफा सेवा संस्था असून हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, व्हेंटिलेटर, बीआयपीएपी (बिलीवेल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) आणि सीपीएपी (सतत पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) मशीन सारख्या जीवनरक्षक उपकरणांच्या खरेदीसाठी देखील मदत करणार आहे.
तसेच केअरला मिळालेल्या फंडातून कोविड केअर सेंटर तयार केले जाणार आहे. यासह ऑक्सिजन, पीपीई किट आणि अन्य आवश्यक सामानाची खरेदी करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची बातमी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.