TOD Marathi

टिओडी मराठी, मॉस्को, दि. 11 मे 2021 – रशियाच्या कझान शहरात मंगळवारी एका शाळेमध्ये घुसून काही हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्लेखोरांनी शाळेत घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये सुमारे 13 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. त्यात 8 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे, अशी माहिती मिळाली असून यात एका शिक्षकाचाही मृत्यू झाला आहे.

रशियातील इमर्जन्सी सर्व्हीसच्या एका प्रवक्त्यांनी याबाबत सांगितले की, शाळेत घुसलेल्या हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्या हल्ल्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यासह अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या दोन मुलांनी थेट तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून खाली उडी मारली. एवढ्या खूप उंचावरून खाली पडल्याने त्यांचाही मृत्यू झाला.

शियातील वृत्तसंस्था RIA ने दिलेली माहिती अशी, शाळेच्या चौथ्या मजल्यावर एका हल्लेखोरानं काही जणांना बंदी बनवूनही ठेवलं. या घटनेतील 12 जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

या वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, शाळेच्या आत एक स्फोटही झाला असून हल्ल्याची माहिती मिळता सुरक्षारक्षक घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी दोन हल्लेखोरांना ठार केलं असून एका संशयिताला अटकही केली.

शाळेच्या इमारतीचे नुकसान झाल्याचे काही व्हिडिओ समोर येत आहेत. मात्र, हल्ल्यामागचे कारण किंवा इतर काही गोष्टी अद्याप स्पष्ट झाल्या नाहीत. कझान हा मुस्लीमबहुल प्रांत असून तातारस्तानची राजधानी म्हणून हे ओळखलं जाते.