TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 23 जुलै 2021 – राज्यसभेत बेशिस्त वर्तन केल्याच्या कारणावरून तृणमुल कॉंग्रेसचे सदस्य शांतनू सेन यांना संसद अधिवेशनाच्या उर्वरीत काळासाठी राज्यसभेतून निलंबीत केले आहे. सरकारच्या वतीने आज हा प्रस्ताव मांडला आणि तो मंजुर केला आहे.

संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. शांतनू सेन यांनी काल राज्यसभेमध्ये माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून ती फाडली होती. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्या विरोधामध्ये ही कारवाई केली आहे.

सभागृहामध्ये आवाजी मतदानाने हा प्रस्ताव संमत झाल्यानंतर अध्यक्ष नायडू यांनी सेन यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. आपल्या विरोधात नियम बाह्यपणे हा ठराव मांडून तो संमत केल्याचा आरोप करून सेन यांनी सरकारचा निषेध केला.

संबंधित मंत्र्यांनी सेन यांना धमक्‍या दिल्या असल्याने त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी तृणमुलचे सदस्य सुखेंदु शेखर रे यांनी केली. पण, त्यावर अध्यक्ष नायडू म्हणाले की, सभागृहाचे कामकाज तहकुब झाल्यानंतर हा प्रकार घडला.