टिओडी मराठी, दि. 25 मे 2021 -महाराष्ट्र राज्यात ‘त्या’ 12 विधानपरिषद सदस्य नियुक्तीचा अधिकार राज्यपालांना आहे. मात्र, अदयाप राज्यपाल यांनी 12 विधानपरिषद सदस्यांची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे राज्यपाल यांच्या वागण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत मंत्री जयंत पाटील म्हणाले, आजपर्यंत कोणतेच राज्यपाल सरकारसोबत असे वागले नाहीत.
मंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, आम्ही 12 विधानपरिषद सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव राज्यपालांच्या हातात दिलाय. अनेकदा त्याची त्यांना आठवणही करून दिलीय. त्यावेळी त्यांनी आम्हाला खासगीमध्ये काही गोष्टी सांगितल्यात. त्या इथे उघड करू शकत नाही, असा गौप्यस्फोट आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
या दरम्यान, आतापर्यंत राज्यात अनेकांची सत्ता आली आणि गेली. पण, आजपर्यंत कोणतेच राज्यपाल सरकारसोबत असे वागलेले नाहीत. राज्य सरकारच्या शिफारशी राज्यपालांनी मान्य करायच्या आहेत, असे संकेत असल्याचेही मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील म्हणाले, राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत. ते मुद्दाम असे करत असल्याचे आपण म्हणणार नाही. मात्र, राज्य सरकारने शिफारस केलेली ही १२ सदस्यांची पदे बराच काळ रिक्त असल्याचे शल्य आता जनतेला वाटतंय. त्यामुळे या वाढत्या रोषातून हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
महाराष्ट्र सरकारने कोरोनाची परिस्थिती तितक्याच गांभीर्याने आणि अतिशय चांगली हाताळली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः रात्रंदिवस कार्यरत आहेत. मुंबई, पुणे यांसह राज्यभर या कोरोनावर नियंत्रण आणि काही प्रमाणात मात करण्यात यश आलंय. आता राज्यातील परिस्थितीही सुधारली आहे.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केलं आहे. त्यामुळे सरकारवर टीका करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. तसेच फडणवीस विरोधी पक्षनेते असून, विरोधी पक्षाचे काम करताना सरकारचे कौतुक करणे बहुतेक त्यांना मान्य नाही. म्हणून ते टीका करत असतील, असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला आहे.