TOD Marathi

कात्रज घाट परिसरात बिबट्याचा वावर!; नागरिकांनी सावधानता बाळगावी, वन विभागाकडून आवाहन

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, पुणे, दि. 25 मे 2021 – जंगलातील बिबट्याने आता मानववस्तीकडे मोर्चा वळविला आहे. कात्रज डोंगररांगा आणि घाट परिसरात सहा महिन्यांपूर्वी दोन बिबटे आढळून आले होते. वन विभागाने शिताफीने त्यांना पकडले होते. परंतु, भिलारेवाडी येथील धनावडेनगर नागरीवस्तीलगत पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

एक मादी आणि दोन बछड्यांचा वावर आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉक, जॉगिंगला जाणाऱ्या तसेच रात्री उशिरा या परिसरात असलेल्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वन विभागाकडून केले आहे.

गुजर-निंबाळकरवाडी आणि भिलारेवाडी हद्दीलगत घाट परिसरामध्ये हत्ती डोंगर, आंबील ढग अशा अनेक टेकड्या व डोंगर आहेत. दोन मोठे पाझर तलाव ही आहेत. त्यामुळे वन्य पशू-पक्ष्यांचे वास्तव्य अधिक प्रमाणात आहे. कात्रज घाट परिसरात महानगरपालिका आणि ग्रामपंचायत हद्दीतील कचरा सर्रास टाकला जात आहे.

तसेच मांस, दुकानातील कचराही फेकला जात आहे. त्यामुळे शहरातील मोकाट कुत्री, डुक्कर रात्रीच्या वेळी येत असतात. त्यांची सोपी शिकार करण्यासाठी बिबटे येत असावेत, असा अंदाज वन विभागाने व्यक्‍त केलाय. कात्रज घाट आणि डोंगररांगा नागरी वस्तीजवळ असल्याने संबंधित वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होतेय.

रात्रीच्या वेळी बिबट्या दिसत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जातंय. त्यामुळे भल्या पहाटे अथवा सायंकाळी उशिरा डोंगरावर ट्रेकिंग किंवा मॉर्निंग वॉकसाठी जाताना नागरिकांनी एकटे जाऊ नये. सावधानता बाळगावी. बिबट्याचा ट्रेस काढण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार पिंजरे लावले जातील, असे भिलारेवाडी वनविभागाचे वनरक्षक संभाजी धनावडे यांनी सांगितले आहे.