TOD Marathi

नवी दिल्ली: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. या कपातीनंतर आता देशात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ५ रुपयांनी तर डिझेलचे दर १० रुपयांनी कमी झाले आहेत. आजपासून नवीन दर लागू झाले आहेत. एकीकडे शंभरी ओलांडायची आणि नंतर ५ – १० रुपयांनी स्वस्त करायचं अशी टीका देखील सध्या होत आहे.

आगामी काळात पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवूनच मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलचा दर कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका विरोधी पक्षाकडून सुरू आहे. तर दुसरीकडे केंद्राने इंधनावरील कर कमी केला असून, आता राज्याची पाळी आहे. राज्याने जर कर कमी केला तर पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त होईल असे प्रत्त्युत्तर भाजपाच्या वतीने विरोधकांना देण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी, राज्य सरकारला इंधनाच्या दरात कपात करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. केंद्राने अबकारी करात कपात केली की राज्य सरकारचा VAT आपोआप कमी होतो, असं त्यांनी सांगितलं.