TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 7 जुलै 2021 – राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गाजले ते गदारोळ, घोषणाबाजी, हमरीतुमरी आणि आमदारांचे निलंबनामुळे. अधिवेशनादरम्यान आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ घातला आणि जागेवरून उठून तालिका अध्यक्षांसमोरील राजदंड पळविला. यावरून राष्ट्रवादीने आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा-कौर यांच्यावर टीका केली आहे. तर, राणा यांची पत्नी नवनीत राणा यांचा जातीचा दाखल मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरविला होता. त्यानंतर त्या सुप्रीम कोर्टात गेल्या. मात्र, यावरून ‘बायको जात चोरते, अन नवरा राजदंड पळव’तो असं म्हणत हे दोघं बंटी-बबली असल्याची टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील गाजले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी गरजेचा असणारा इम्पिरिकल डेटा केंद्राने द्यावा. याबाबतच्या ठरावावेळी अभूतपूर्व गोंधळ झाला.

विरोधकांनी विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासमोरील माईकही ओढला. त्यानंतर 12 आमदारांचे एका वर्षासाठी निलंबनचा ठराव तालिका अध्यक्षांनी मंजूर केला. याच काळात रवी राणा यांनी राजदंड पळविला. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी मार्शल बोलावून राणा यांना सभागृहातून बाहेर काढले. या मुद्द्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होता आहे.

राणा पती-पत्नी टार्गेटवर :
अधिवेशनात राजदंड पळविणारे आमदार रवी राणांवर तर टीका होत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे चर्चेत आलेल्या खासदार नवनीत राणा यांनाही राष्ट्रवादीने लक्ष्य केलं आहे.

नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असलं तरी त्यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत.