TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 7 जुलै 2021 – आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राजधानी दिल्लीमध्ये राजीनामा सत्र बघायला मिळालंय. अनेक कॅबिनेट मंत्र्यांना खुर्ची खाली करण्यास सांगितलं आहे. यात सुमारे बारा मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलेल्या मंत्र्यांच्या नावांपेक्षा राजीनामा दिलेल्या मंत्र्यांच्या नावांची चर्चा होत आहे.

आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील नव्या सदस्यांची यादी जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यासहीत राज्यातील एकूण चार खासदारांना मंत्रीपद मिळालं आहे.

मात्र, याच मंत्रिमंडळातील अगोदरच्या मंत्र्यांना डच्चू दिला आहे. यात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्यासह इतर 11 नेत्यांनी राजीनामे दिले आहेत.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची मंत्रिमंडळातून गच्छंती केली होती. त्यानंतर आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार, सदानंद गौडा, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांचेही राजीनामे घेतले आहेत.

त्यानंतर आता केंद्रीय माहिती व प्रसारण आणि अवजड उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनीही राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्रातील दानवे ‘सेफ’? :
इतर मंत्र्यांबरोबर रावसाहेब दानवे यांनीही राजीनामा दिला आहे, असं बोललं जात होतं. मात्र, अखेर यादी समोर आली असून त्यात रावसाहेब दानवे यांचा समावेश नाही.

रावसाहेब दानवे यांनीही यावर खुलासा केला होता. ‘पक्षातून कोणाचाही फोन आलेला नाही. मला राजीनामा देण्यासही सांगितले गेलं नाही,’ असे दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी या मंत्र्यांचा राजीनामा :
१) सदानंद गौडा
२) रवि शंकर प्रसाद
३) थावर चंद गेहलोत
४) रमेश पोखरियाल निशंक
५) हर्ष वर्धन
६) प्रकाश जावडेकर
७) संतोष गंगवार
८) बाबूल सुप्रियो
९) संजय धोत्रे
१०) रत्तन लाल कटारिया
११) प्रताप चंद्र सारंगी
१२) सुश्री देबश्री चौधरी