TOD Marathi

मुंबई:

गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि माझ्यात वाद सुरु होता. मतभेद झाल्यानंतर माझ्याकडून गुवाहाटीसंदर्भात काही वाक्यं निघाली. या वाक्यांमुळे बच्चू कडू आणि शिंदे गटातील आमदार दुखावले गेले असतील तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. (MLA Ravi Rana expressed apologies on statement related Bacchu Kadu) मी बच्चू कडू यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य मागे घेत आहे. बच्चू कडू यांनीही माझ्याविषयी अपशब्द आणि न पटणारी भाषा वापरली होती. तेदेखील त्यांची ही वक्तव्य माघारी घेतील, असे म्हणत अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेतले. आमदार रवी राणा हे रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यावेळी त्यांच्यात तब्बल साडेतीन तास चर्चा झाली होती. (MLA Ravi Rana met CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis) यानंतर आज सकाळी रवी राणा पुन्हा एकदा फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. याठिकाणी काही काळ चर्चा झाल्यानंतर रवी राणा हे सागर बंगल्यातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकत असल्याची घोषणा केली.

“मी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणिउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. साडेतीन तास ही बैठक सुरु होती. काही मतभेद होते, काही विचार, भाष न पटणारी होती. त्यावरही चर्चा झाली. बच्चू कडू हे देखील माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यातील आमदार आहेत. शिवसेनेतील आमदार आणि बच्चू कडू माझे सहकारी आहेत. त्यामुळे वाद सुरु असताना तोंडातून काही वाक्य निघालं असेल तर मी ते वक्तव्य मागे घेतो. आम्ही दोघेही सरकारसोबत आहोत. आमच्या वादापेक्षा महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी हा विषय इथेच संपवत आहे. माझ्या शब्दाबद्दल कोणाला काही आक्षेप असेल, कुणी दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत, त्यांचा आदेश माझ्यासाठी प्रमाण आहे. त्यामुळे मी गुवाहाटीसंदर्भात केलेले माझे वक्तव्य मागे घेत आहे, असे रवी राणा यांनी सांगितले.

आमदार रवी राणा यांच्या या वक्तव्यानंतर बच्चू कडू यांनीदेखील माध्यमांशी संवाद साधला. कडू यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. आज संध्याकाळी सहा वाजता माझी कार्यकर्त्यांची बैठक आहे. त्यानंतर मंगळवारी अमरावतीमध्ये मी माझी भूमिका जाहीर करणार आहे. मी काही अयोग्य केलं असं मला वाटत नाही. माझ्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न या आरोपांमुळे निर्माण झाला होता. त्यामुळे भूमिका घेणे महत्त्वाचे होते. उद्या बैठकीत कार्यकर्ते काय भूमिका घेतील यावर माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कडू यांनी सांगितले.

वाद रवी राणांमुळे सुरू झाला,  माझ्यामुळे नाही

वाद व्हायला नको होता. मात्र आरोपांना सुरुवात रवी राणांनीच केली. त्यामुळेच वादाला तोंड फुटलं. मी वाद केलाच नाही. पण आरोप झाल्यानंतरही गप्प राहिलो असतो तर लोकांनी मला बदनाम केलं असतं. त्यामुळे आरोपांना प्रत्युत्तर दिल्यानं वाईट किंवा चुकीचं केलं असं मला वाटत नाही. जे काही असेल, या वादात आम्ही आयुष्य घालवणार नाही. व्यक्तीगत आरोपांमध्ये शक्ती वाया घालवण्यापेक्षा सार्वजनिक कामासाठी शक्ती लावण्याचा प्रयत्न करू, असंही कडू म्हणाले. माझ्यावर गंभीर आरोप झाले होते आणि माझ्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. एखाद्या चळवळीच्या कार्यकर्त्यावर आरोप होऊन त्याचं आयुष्यच बरदात होत असेल तर आवाज उठवणंही महत्त्वाचं आहे. पण रवी राणांनी मागितलेली दिलगिरी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवसींनी केलेली मध्यस्थी हे कार्यकर्त्यांसमोर मांडतो. त्यावर कार्यकर्ते काय म्हणतात याचा संपूर्ण विचार करून उद्या आम्ही आमची भूमिका स्पष्ट करतो, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.

राणा आणि कडू यांच्यात नक्की वाद काय?

गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी काय केलं, हे आम्हाला माहिती आहे. बच्चू कडूंनी 50 खोके घेतले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी देखील जोरदार उत्तर दिलं होतं. रवी रणांच्या अशा वक्तव्यामुळे लोकांमध्ये प्रतिमा वाईट होते असं बच्चू कडू यांचे म्हणणं होतं. त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत गेल्या. माझ्यावर गंभीर आरोप झाले होते आणि माझ्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. एखाद्या चळवळीच्या कार्यकर्त्यावर आरोप होऊन त्याचं आयुष्यच बरदात होत असेल तर आवाज उठवणंही महत्त्वाचं आहे. असंही बच्चू कडू म्हणाले.