TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 14 मे 2021 – अरबी समुद्राच्या आग्नेय भागामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असल्यामुळे क्षेत्राची तीव्रता अधिक वाढणार आहे. त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याचे संकेत वर्तविले जात आहेत. त्यानंतर ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून त्याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.

येत्या काही दिवसांत राज्यात पूर्वमोसमीच्या सरीचा प्रभाव वाढणार आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार झाल्यानंतर राज्याला अधिक फटका बसणार नाही, असे असले तरी केरळ, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांत १५ मेच्या दरम्यान अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच सुरुवातीला या चक्रीवादळामुळे वाऱ्याचा ताशी वेग ४० ते ५० किलोमीटर राहील आणि तो हळूहळू वाढत जाईल.

साधारणत: ताशी ८० किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मासेमारीसाठी मत्स्य व्यवसायिकांनी आजपासून पुढील दोन ते तीन दिवस समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे. तसेच अरबी समुद्र, दक्षद्वीप आणि मालदीव परिसर व हिंद महासागरातही वेगाने वाहणार आहेत. मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण बनण्याची शक्यता वर्तविली आहे.

मॉन्सूनला सुरुवात होण्यासाठी काही दिवस बाकी असताना राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढत असून तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण बनले आहे. हेच वातावरण पावसासाठी पोषक होत आहे. राज्यातील तापमानात चढऊतार होत आहे.

राज्यात या जिल्ह्यांत होणार पूर्वमोसमी पाऊस :
शुक्रवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ
शनिवार : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ
रविवार: संपूर्ण महाराष्ट्र