TOD Marathi

भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय!; रुग्णांच्या संख्येत घट होऊन वाढला ‘रिकव्हरी रेट’

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 मे 2021 – देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोनाग्रस्त रुग्ण संख्येत वाढ झाली होती. यात अनेकांचा मृत्यू देखील झाला. आता देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. गुरुवारी देशात 3 लाख 42 हजार 896 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून गुरुवारी नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा अधिक लोक कोरोनातून बरे झालेत. गुरुवारी 3 लाख 44 हजार 570 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, मृतांच्या संख्येतही घट आलीय. सध्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 37 लाख 327 एवढी आहे.

गुरुवारी राजधानी दिल्लीत नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट आलीय. दिल्लीत 10 हजार 489 नवीन रुग्णांची नोंद झालीय. तर, 308 रुग्णांचा मृत्यू झालाय.

दुसरीकडे, महाराष्ट्र राज्यात देखील नवीन 42 हजार 582 रुग्णांची नोंद झालीय. तर, 850 जणांचा मृत्यू झालाय. तर, केरळमध्येही बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रुग्णसंख्येत घट नोंदवली आहे. केवलमध्ये 39 हजार 955 नवीन रुग्ण आढळले असून 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी सरकारने म्हटलं आहे की, कोरोना पुन्हा समोर उभा ठाकण्याची शक्यता आहे. अशात राज्यांच्या मदतीने राष्ट्रीय स्तरावर तयारी ठेवावी लागेल. कोरोनासंबंधी नियमांसोबत आरोग्य सुविधाही वाढवाव्या लागतील.

नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले, ऑगस्ट ते डिसेंबरच्या ५ महिन्याच्या काळात देशात 200 कोटीहून अधिक कोरोना लसी उपलब्ध होणार आहेत. तसेच रशियन लस स्पुतनिक हि पुढील आठवड्यापासून उपलब्ध होईल.

देशात कोरोनाने कहर केल्याने आरोग्य सुविधांचा मोठा अभाव जाणवत आहे. या काळात इतर देशांनी मदतीचा हात पुढे करत भारतात मेडिकल साहित्य पाठवलं आहे. आजहि दोहा, कतर इथून विशेष विमानांच्या माध्यमातून भारतात मेडिकल सहाय्यता पाठवली जाणार आहे.