TOD Marathi

टिओडी मराठी, काबूल, दि. 17 ऑगस्ट 2021 – तालिबान दहशतवाद्यांनी अफगाणिस्‍तानवर आपली हुकूमत प्रस्‍थापित केली आहे. त्यामुळे शेकडो भयग्रस्‍त नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. अफगाणिस्‍तानमधील भारतीय दुतावासातील कर्मचार्‍यांसाठी भारतीय हवाई दलाचे विशेष विमान काबूलहून भारताकडे रवाना झाले आहे. अफगाणिस्‍तानमधील भारतीय नागरिकांना परत घेऊन येणारे विशेष विमान अमेरिकी सैनिकांच्‍या संरक्षणात बाहेर काढले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

भारतीय हवाई दलाच्‍या सी-१७ विमान आज काबूलहून भारताकडे रवाना झाले आहे. या विमानामध्ये सुमारे १४० भारतीयांसह राजदूत आर. टंडन यांच्‍यासह इतर अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना काबूलमधून परत भारतात आणण्‍यात येत आहे. काबुलमध्‍ये सुमारे ५०० भारतीय नागरिक अडकलेत.

अफगाणिस्‍तानमधील अराजक परिस्‍थिती असताना ही दुतावासात अडकलेल्‍या कर्मचार्‍यांना सुरक्षित मायदेशात आणण्‍यात भारताला यश आले आहे. अफगाणिस्‍तानमधील अराजक परिस्‍थितीमुळे भारताने व्‍हिसा नियमांत शिथिलता आणण्‍याचा निर्णय घेतला आहे.

अफगाणमधून नागरिकांना मायदेशात परत येण्‍यासाठी स्‍वंतत्र यंत्रणा कार्यन्‍वित केली आहे. याला ‘ई – इमर्जेंसी एक्‍स -मिस व्‍हिसा असे नाव दिले आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्‍या सूत्रांनी सांगितले आहे.