TOD Marathi

परदेशी जाणारे विद्यार्थी, Tokyo ऑलिंपिक खेळाडूंच्या दुसऱ्या डोससाठी 7 सेंटर सुरु; पालिकेची माहिती

टिओडी मराठी, मुंबई, दि. 16 जून 2021 – परदेशी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे उमेदवार व टोकियो ऑलिंपिकसाठी जाणारे खेळाडू-अधिकारी वर्गासाठी पालिकेने ७ कोरोना केंद्रे सुरू केलीत. यात पालिकेच्या केईएम, कस्तुरबा, सेव्हन हिल्स, कूपर, शताब्दी, राजावाडी रुग्णालय आणि दहिसर कोविड सेंटरमध्ये लसीकरणाची व्यवस्था केली आहे. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस 28 दिवसांनी कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस घेता येणार आहे.

मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू केले. यात सद्यस्थितीत पालिका, खासगी रुग्णालयांसह सुमारे 370 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत 41 लाखांवर डोस दिलेत. मात्र, उपलब्ध डोसच्या पार्श्वभूमीवर 18 ते 45 पर्यंतच्या वयोगटासाठी सुरू करण्यात आलेले लसीकरणही पालिकेला बंद करावे लागले. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला होता.

पालिकेने विद्यार्थी व ऑलिंपिक खेळाडूंना 84 दिवसांची अट शिथिल करावी, अशी मागणी केंद्राकडे केली होती. यानुसार केंद्राकडून परवानगी मिळाल्यामुळे पालिकेने ७ सेंटर सुरू केली आहेत. परदेशी जाणाऱ्या ३ हजारांवर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पहिला डोस घेतला आहे.

केंद्राने 21 जूनपासून 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा केलीय. यासाठी पालिकेने 500 लसीकरण केंद्रांचे नियोजन केलंय. मात्र, केंद्रे असली तरी उपलब्ध होणाऱ्या डोसनुसार लसीकरण करण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेने केईएम, नायर रुग्णालयात तयारी केलीय. यासाठी केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. ‘एथिक्स’ कमिटीकडे कार्यवाही करण्यासाठी पालिकेने सर्व कागदपत्रे तयार ठेवली आहेत.

लसींच्या पुरवठय़ासाठी कंपन्यांशी बोलणी देखील सुरू आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.