TOD Marathi

मुख्यमंत्री साहेब, MPSC परीक्षेच्या फाईलवर सही करता की आणखीन स्वप्नील लोणकर होण्याची वाट बघता? ; MPSC विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

संयुक्त पूर्व परीक्षा गट – ब’ची परीक्षा कधी होणार? ; विद्यार्थी चिंतेत, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज

टिओडी मराठी (महेश रेड्डी, ज्ञानेश्वर रेड्डी ) पुणे , दि. 2 ऑगस्ट 2021 – मागील दोन वर्षांपासून ‘संयुक्त पूर्व परीक्षा गट – ब’ च्या परीक्षेची तारीख राज्य शासनाकडून वारंवार पुढे ढकलली जात आहे. यामुळे उमेदवार प्रचंड तणावातून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. वय वाढत असून यासाठी पात्र असलेले उमेदवार अपात्र ठरत आहेत. राज्यातील एकूण 4 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामुळे ही परीक्षा तातडीने घ्यावी, तसेच ही परीक्षा घेण्यासाठी मुख्यमंत्री यांनीही यात लक्ष घालावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार MPSC ‘संयुक्त पूर्व परीक्षा गट ब’ परीक्षेची तारीख घोषित करण्याची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचली असून यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होणे बाकी आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होणार नाही. तोपर्यंत परीक्षेला परवानगी मिळणार नाही.

सध्या कोरोनाची दुसरी लाट राज्यात सुरु आहे. त्यामुळे अनेक शाळा, महाविद्यालये राज्य सरकारने बंद ठेवली आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, विविध निर्बध सरकारकडून लावले जात आहेत.

यातच मागील २ वर्षापासून संयुक्त पूर्व परीक्षा गट – ब च्या परीक्षेची तारीख जाहीर केली जात नाही. मात्र राज्यातील अन्य परीक्षांचे वेळापत्रक संबंधित विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. तर MPSC परीक्षा घेण्याचे वेळापत्रक का जाहीर केलं जात नाही असा संतप्त सवाल विद्यार्थी उठवत आहेत.

MPSC परीक्षा घेण्यासंदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभाग आणि मुख्य सचिव यांची परीक्षा घेण्यासाठी परवानगी मिळाली असून फक्त मुख्यमंत्र्यांच्या सही अभावी परीक्षा थांबली आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी टिओडीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

याच संदर्भात टिओडी मराठीने MPSC विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, ते म्हणाले मुख्यमंत्री कार्यालयाचे परीक्षा घेण्यासंदर्भातचे पत्र विभागाला मिळाले तर कमीतकमी 40 दिवसात MPSC परीक्षा घेऊ शकते. अशी माहिती अधिकाऱ्यांनी TOD ला दिली.

महाविकास आघाडी सरकार हे मुर्दाड, लबाड, संवेदनाहीन सरकार आहे. राज्यातील गोर-गरीब, वंचित, सामान्य कुटुंबातून आलेल्या लाखों मुलांचे आयुष्य परीक्षा घेतल्या नाहीतर उध्वस्त होणाच्या मार्गावर आहे. विद्यार्थी सद्यस्थितीला तणावातून जात आहेत. सरकारला या मुलांचे कोणतेही घेणदेण नाही. यांना फक्त आपल्या लेकरा बाळांचे राजकीय भविष्याची चिंता आहे. पण महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हे सरकार खेळत आहे. अजून किती स्वप्नील लोणकर होण्याची हे सरकार वाट बघत आहे. जो काही निर्णय घ्यायचा तो घेऊन लवकर परीक्षा व्हायला पाहिजेत.
                                   – राम सातपुते, आमदार भाजपा

कोरोना मुळे मागील दोन वर्षापासून एमपीएससीची परीक्षा सहा वेळा पुढे ढकलण्यात आली. मात्र परीक्षा पुढे ढकलून सुद्धा अदयापपर्यंत परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. विद्यार्थी प्रचंड तणावात आहेत. त्यांच्यावर मानसिक, सामाजिक दडपण येत आहे. वय वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत फक्त त्यांच्यासमोर एकच प्रश्न आहे की परीक्षेची तारीख कधी जाहीर होणार? मुख्यमंत्री कार्यालयात परीक्षा घेण्यासंदर्भातची फाईल 8 दिवसापासून पडून आहे. मात्र त्यांनी अद्याप स्वाक्षरी केली नाही. माझा त्यांना एकच प्रश्न आहे मुख्यमंत्री महोदय फाईल वर सही करता की आणखी स्वप्नील लोणकर होण्याची वाट बघता? लवकरात लवकर परीक्षा घेण्याच्या फाईल वर सही करुन तारीख जाहीर करावी हीच आमची मागणी आहे.
                   – महेश बडे, MPSC Students Rights

याबाबत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकारातून एमपीएससी स्टुडन्ट राईटच्या वतीने मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले होते. यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली व्यथा मांडली होती.

आपत्ती विभागाकडून 15 दिवसांच्या आत परीक्षा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आहे. याबाबत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी देखील आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही.

तसेच सरकारने लवकर तारीख जाहीर करून परीक्षा घ्यावी. यामुळे उमेदवारांना परीक्षा देणं आणि पुढील पर्याय निवडणे सोयीचे होणार आहे, यासाठी सर्व शासकीय विभाग आणि मुख्यमंत्री यांनी याबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.