TOD Marathi

मुंबई: सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीचा परिणाम आता एसटीवर सुद्धा झाला आहे. काल म्हणजे २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून एसटी महामंडळाने तिकीट दरवाढ केली आहे. एसटी महामंडळाच्या 17.17 टक्के भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे एसटीचा प्रवास किमान 5 रुपयांनी महागणार आहे. एसटीच्या सहा किलोमीटरच्या प्रवासानंतरच्या प्रत्येक टप्प्याला ही दरवाढ लागू असेल.

गेल्या दोन वर्षांत कोरोना कालावधीमध्ये एकीकडे होणारी इंधनाची दरवाढ आणि घटनारे प्रवासी लक्षात घेता एसटी महामंडळ अडचणीत आले आहे. गेल्या काही महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांची पगारही वेळेवर झालेली नाही. यामुळे राज्यभरात आत्महत्येच्याही घटना घडल्या होत्या. एसटी कर्मचारी संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एसटी ही सर्वसामान्यांची जिवनवाहिनी असल्याने ती टिकण्यासाठी ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे मतही एसटीच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आले.

दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे दर महिन्याला एसटीला शेकडो कोटीचा तोटा सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार होत नसल्याने आतापर्यंत राज्यभरात २७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे एसटीवर मोठे संकट ओढवले आहे. आता नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच 6 किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ 5 रुपयाच्या पटीत असून 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे.