TOD Marathi

दादरा नगर-हवेली: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. पंचांची विश्वासार्हता संपायला नको, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते आज दादरा नगर-हवेलीत बोलत होते.

आरोप लागले आहेत तर एनसीबीने त्याची चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नवाब मलिक आणि संजय राऊत यांचे आरोप आणि इशाऱ्यावर बोलताना अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.

शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे त्याच सोबत हे सरकार खांडणीखोर असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला आहे. ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील आणि काम मुघलांचं करतील, असा घणाघात देखील फडणवीस यांनी केलाय.