TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 19 जून 2021 – शिवसेना पक्षाच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. माझ्या शिवसेना कुटुंबातील माता भगिनी आणि बंधुंशी संवाद साधत आहे. त्यामुळे काहीकाळ मी मुख्यमंत्रिपद बाजूला ठेवतो आणि शिवसैनिकांशी संवाद साधतो. जुन्या फळीतील शिवसैनिक मला मार्गदर्शन करत आहेत.

शिवसेनेच्या कार्यकाळात ३ दिवस खूप महत्त्वाचे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस, शिवसेनेचा वर्धापन दिवस आणि मार्मिकचा वर्धापन दिवस हे तीन दिवस महत्त्वाचे आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, अनेकांच्या पोटात दुखतंय. पण, शिवसेना त्यांना औषध देत आहे. मी अनेकांचं अंतर्मन पाहिलंय. त्यामुळे अनुभवाचं गाठोडं घेऊन पुढे जात आहे. अनेकजण स्वबळाचा नारा देत आहेत. आपण पण स्वबळाचा नारा देऊ. न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं. अन्याय होतोय आणि न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ नाही.

अगोदर तलवार उचलण्याची ताकद कमवा. मग, वार करा. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे. निवडणुका येतात आणि जातात. हार-जीत होत असते. कोण हारतं कोण जिंकतं?. जिंकलं आनंद आहे. पण, हारल्यानंतर सुद्धा पराभूत मानसिकता घात करते.” असा टोला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला हाणला.

मागील निवडणुकीत दुर्दैवाने जे पराभूत झाले त्यांच्याशी मी संवाद साधला. त्यांना सांगितलं आपल्या समोरचा पराभूत हा शब्द काढा. पराभव हा निवडणुकीत झालाय. आपण मनाने खचलो नाही. मनाने खचला तो संपला. ते जे बळ आहे ते स्वबळ आहे.

मागील ५५ वर्षात अनेक संकटं आली. आज सुद्धा संकटाचा सामना करतोय. संकटाला मी घाबरलो तर मी शि्वसैनिक कसा? संकटाला मी घाबरलो तर शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेब मला माफ करणार नाहीत.

संकटावर चालून जायचं असेल तर आत्मविश्वास पाहीजे आणि स्वबळ पाहिजे. काहीजण उद्य़ा बातमी करतील. उद्धव ठाकरेंनी दिला स्वबळाचा नारा, नारा नाही, हा आमचा हक्क आहे. आमचा अधिकार आहे. तो केवळ निवडणुकांशी संबंधित नाही. तर अन्यायाविरुद्ध वार करण्यासाठी आहे. कोणाविरुद्ध अन्याय? स्वत:विरुद्ध अन्याय अजिबात नाही.” असा प्रश्न त्यांनी शिवसैनिकांना विचारला.

“शिवसेना जेव्हा नव्हती तेव्हा कार्यालयातील खिडक्या, दरवाजे मराठी माणसांसाठी बंद होत्या. त्या बंद दरवाज्यावर धडक मारून कार्यालयात मराठी माणसं घुसवली. आणि त्यांना न्याय मिळवून दिला. हे शिवसेनेचं कतृत्व मनगटात ताकद नसती तर काहीच होऊ शकलं नसतं.

शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला त्याच्या मनगटातल्या ताकदीची जाणीव करून दिलीय. त्यानंतर मराठी माणूस पेटून उठला. हा शिवसेनेचा इतिहास आहे. शिवसेनाप्रमुखाच्या लक्षात हिंदुत्वावर संकट आलंय. तेव्हा त्यांनी ‘गर्व से कहो, हम हिंदू है’, असा नारा दिला. शिवसेनेने मराठी आणि हिंदुंना आधार दिला. हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे. असंही त्यांनी यावेळी सांगितलंय.

करोनाचं संकट पाहता सलग दुसऱ्या वर्षी वर्धापनदिनाचं ऑनलाईन आयोजन केलं आहे. यावेळी शिवसेनेचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी त्यांच्या सूचना लक्षपूर्वक ऐकत आहेत.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर शिवसेना हा दुसरा वर्धापन दिन आहे. मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली होती. शिवसेनेनं मागील ५५ वर्षात महाराष्ट्रासह देशभरात दबदबा निर्माण केलाय.