TOD Marathi

आज जवळपास सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. गुरुवारी शेअर बाजारामध्ये आलेल्या तेजीला आज लगाम बसल्याचं चित्र दिसत आहे. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 773.11 अंकांनी घसरला असून निफ्टीही 231 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.31 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,152.92 वर येऊन पोहोचला, तर निफ्टीमध्ये 1.31 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,374.80 वर आला आहे.

आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अँड गॅस, बँक आयटी, फार्मा आणि रिॲलिटी या सर्वच सेक्टरच्या शेअर्सची विक्री झाली आहे. आयटी आणि रिॲलिटी क्षेत्रामध्ये तर 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज 896 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2318 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. मात्र, 105 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झालेला दिसून आला नाही.

अमेरिकेतील महागाईत प्रचंड वाढ झाली असून ती आता विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे त्याचा परिणाम तिथल्या शेअर बाजारावर तर झाला आहेच सोबतच भारतासह जगातल्या सर्वच शेअर बाजारात चढ – उतार होण्यास सुरुवात झाली आहे.