TOD Marathi

शास्त्रज्ञांना अंतराळात सापडली नवीन Earth ! पाण्याचे ढग असण्याची वर्तविली शक्यता

टिओडी मराठी, दि. 15 जून 2021 – शास्त्रज्ञ अंतराळात अनेक तारे, ग्रह, आकाशगंगा आदींचा शोध घेत आहेत. हे अंतराळ खूप विशाल आहे. त्यामुळे आपल्या पृथ्वीसारखा दुसरीकडे ग्रह असू शकतो, हि उत्सुकता अनेकांमध्ये ताणली गेली होती. आता शास्त्रज्ञांना अंतराळात नवी पृथ्वी सापडली आहे.
पृथ्वीपासून सुमारे 90 प्रकाशवर्ष दूर अंतरावर एका बाह्यग्रहाचा शोध लागलाय. या अद्भुत ग्रहावर पृथ्वीसारखे पाण्याचे ढग असण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. ‘पृथ्वी 2.0’ च्या शोधाबद्दल शास्त्रज्ञांमध्ये उत्सुकता आहे.

‘टीओआय- 1231 बी’ असे या बाह्यग्रहाचे नाव आहे. तो 24 दिवसांत आपल्या ताऱ्याची परिक्रमा पूर्ण करतो. हा ग्रह आपल्या सूर्याची परिक्रमा करत नाही. तर ‘एनएलटीटी 24399’ या दुसऱ्या ताऱ्याची परिक्रमा करत असतो.

हा तारा सूर्यापेक्षा खूप छोटा व मंद आहे. दुसऱ्या पृथ्वीबाबतचे हे संशोधन ‘द अॅस्टोनॉमिकल जर्नल’च्या आगामी अंकामध्ये प्रकाशित होणार आहे.

‘टीओआय- 1231 बी’ या बाह्यग्रहाचा आकार पृथ्वीपेक्षा खूप मोठा आहे आणि नेपच्यून ग्रहापेक्षा छोटा आहे. त्याचा तारा कमी प्रखर व थंड असल्यामुळे या बाह्यग्रहाचे तापमान वाढत नाही.

या ग्रहावर हायड्रोजन किंवा हेलियमचे वातावरण असू शकते, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय.