TOD Marathi

नाशिक | तरुणांच्या मनातल्या भावना ओळखून त्यांना वाचा फोडणारा नेता प्रसंगी आपल्या मनाचा हळवा कोपरा उघड करायलाही कचरत नाही. नेमकी अशीच एक हळवी आठवण आमदार सत्यजीत तांबे यांनी योग दिनाच्या निमित्ताने शेअर केली आहे. तरुणांसमोर भाषण करताना त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील एका शिक्षिकेची आठवण सांगितली. दिवसातून किमान १० मिनिटे तरी ध्यान लावा, असं सांगणाऱ्या या शिक्षिकेचं वेळीच ऐकलं असतं, तर आयुष्यात खूप पुढे गेलो असतो, अशी कबुलीही आ. तांबे यांनी या भाषणात दिली. त्यांच्या या मनमोकळेपणावर तरुणांमधून चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

जागतिक योग दिनाचं औचित्य साधून आ. सत्यजीत तांबे यांनी योगसाधना आणि ध्यानधारणा यांचं महत्त्व सांगणारा एक व्हीडिओ शेअर केला. त्यात ते एका सभेत भाषण करताना दिसत आहेत. या व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी एक आठवण सांगितली. शाळेत असताना एक शिक्षिका सगळ्या विद्यार्थ्यांना, दिवसातून किमान १० मिनिटं ध्यान लावा, असं सांगायच्या त्यांच्यासमोर आम्ही डोळे मिटायचो आणि ध्यान लावायचं नाटक करायचो. पण त्या वर्गाबाहेर गेल्या की, या ‘ध्यान लावण्याची’ यथेच्छ खिल्ली उडवायचो, असं आमदार तांबे यांनी या व्हीडिओत म्हटलं.

हेही वाचा :…मोठी बातमी: ठाकरे, राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीची छापेमारी, नेमक्या कुणाच्या मुसक्या आवळणार?”

हाच किस्सा पुढे सांगताना ते म्हणाले की, काही काळापूर्वी मित्रांनी काश्मीरला जाण्याचा हट्ट केला. योगसाधना आणि ध्यानधारणेसाठी आपण तिथे जायचं, असं मित्रांनी नक्की केलं होतं. मीदेखील चांगले सहा दिवस त्यांच्यासोबत काश्मीरला गेलो. आम्ही जिथे राहिलो होतो, ती जागा अगदी निसर्गाच्या सान्निध्यात होती. लांबवर मनुष्यवस्ती नव्हती. आम्ही तंबू ठोकून राहिलो होतो. तिथे पहिल्या दिवशी सभोवताली हिमशिखरं, समोरून वाहणारी स्वच्छ नदी अशा वातावरणात ध्यानाला बसलो आणि मला रडू फुटलं, अशी कबुली आ. तांबे यांनी दिली.

ध्यान लावल्यानंतर मला आमच्या त्या शिक्षिकेचा चेहराच आठवला. त्या कळकळीने आम्हाला ध्यानाचं महत्त्वं पटवून द्यायच्या. १४-१५ व्या वर्षी मला जे उमगलं नाही, ते वयाच्या ३८-३९ व्या वर्षी काश्मीरला जाऊन लक्षात आलं. पण यात २०-२२ वर्षं वाया गेली. एवढी वर्षं ध्यान लावून चित्त एकाग्र करायची सवय लागली असती, तर आतापर्यंत खूप पुढे गेलो असतो, असं आ. तांबे म्हणाले. योगविद्या ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. त्यामुळे भारतीयांनी या विद्येकडे अभ्यासू वृत्तीने बघितलं पाहिजे. लहान असो वा मोठा, प्रत्येकाने योगसाधना करायला हवी, असंही आ. तांबे यांनी स्पष्ट केलं. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग अगदी मोकळेपणाने सांगत त्यातून आपण काय शिकलो, हे स्पष्ट करण्याचा आ. तांबे यांचा स्वभाव तरुणाईला भुरळ पाडत असल्याचं या व्हायरल होत असलेल्या व्हीडिओवर तरुणाई देत असलेल्या प्रतिक्रियांवरून सहज लक्षात येतं.