TOD Marathi

मुंबई | राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आदित्या ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याची बातमी समोर येत आहे.  मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या ठिकाणांवरही छापेमारी सुरू आहे. मात्र, अद्याप या नावांना ईडीकडून दुजोरा मिळालेला नाही. ईडीच्या या कारवाईदरम्यान नेमक्या कुणाच्या मुसक्या आवळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून, राजकीय वर्तुळात या छापेमारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते युवासेनेचे पदाधिकारीदेखील आहेत. विविध निवडणुकांमध्ये पदड्यामागची भूमिका ते निभावत असतात. मुंबई महानगरपालिका आणि राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये सूरज चव्हाण यांचा मोठा वाटा आहे.

हेही वाचा : “… दोन्ही राजे आमने-सामने; शिवेंद्रराजेंच्या हस्ते भूमिपूजन, पण उदयनराजे पोकलेन मशीनसह पोहोचले”

तर दुसरीकडे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणारे सुजित पाटकर यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसने कोविड काळात केलेल्या घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून ही छापेमारी सुरू केली आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या आर्थिक गुन्हे विभागाकडून केली आहे. त्यात आता ईडीचीही एन्ट्री झाल्याने अनेक घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत.

कोरोना काळात मुंबईतील दहिसर येथे एक कोविड सेंटर उभारण्यात आले होते. राऊत यांचे अगदी जवळचे उद्योगपती सुजित पाटकर यांनी हे कोविड सेंटर बांधले होते, त्यासाठी पाटकर यांनी रातोरात कंपनी स्थापन केल्याचा आरोप आहे. याला लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस असे नाव देण्यात आले होते. पाटकर यांना याचे कंत्राट मिळाले होते.