TOD Marathi

मुंबई :

भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र त्याचवेळी तुरुंगात असलेले खासदार संजय राऊत यांनी मात्र भाजपवर शरसंधान साधलं आहे. पराभवाची चाहूल लागल्यानेच भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला. काहीही करुन आपला उमेदवार जिंकणार नव्हताच, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळेच त्यांनी माघारीचा निर्णय घेतला, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे.

खासदार संजय राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. त्यापूर्वी न्यायालयाच्या बाहेर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना अंधेरी पोटनिवडणुकीवरुन त्यांनी भाजपला लक्ष्य केलं तसेच राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

“अंधेरी पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्यानेच भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला. अंधेरीत सेना उमेदवार ऋतुजा लटके या ४५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होत्या, भाजपने सर्व्हे केला होता. त्याच सर्व्हेमध्ये भाजप उमेदवाराचा सपशेल पराभव होणार, असं दिसत होतं. त्याच भीतीतून भाजपने हा निर्णय घेतला. राहिला प्रश्न राज ठाकरे यांच्या पत्राचा… तर राज ठाकरे यांचं फडणवीसांना लिहिलेलं पत्र म्हणजे तो एक स्क्रिप्टचा भाग होता…” असं म्हणत राऊतांनी भाजप आणि राज ठाकरेंवर टीका केली.