TOD Marathi

अंधेरी पोटनिवडणुकमध्ये सुरू असलेल्या आखाड्यातून अखेर भाजपने माघार घेतली आहे. हा निर्णय म्हणजे भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. (Jayant Patil on Andheri by election) या निवडणुकीसाठी सुरू असलेले डावपेच ज्यामध्ये ऋतुजा रमेश लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा मंजूर न करणे, त्यांना नाईलाजाने कोर्टात जावे लागणे हा सर्व प्रकार अत्यंत क्लेषदायक व वेदनादायक होता. या सोबतच पक्षाचे चिन्ह गोठवणे, नाव गोठवणे हा प्रकारही या निवडणुकीसाठीच करण्यात आला, असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राची परंपरा ही यापेक्षा वेगळी आहे, ज्यामध्ये एखाद्या जागेसाठी काही दिवस शिल्लक असताना शक्यतो निवडणूक बिनविरोध होते. तसेच या निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला असता, असा दावाही त्यांनी केला. या निर्णयातून अनावश्यक गोष्टी टळल्या आहेत. ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून आणण्याच्या निर्णयाचे जयंत पाटील यांनी स्वागत केले.
दरम्यान, या निवडणुकीत भाजपने माघार घेतली असली तरी इतर पक्षांच्या वतीने भाजपवर टीका करण्यात येत आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील “अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेणे हे म्हणजे भाजपला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी टीका केली आहे.