TOD Marathi

पुणे | राष्ट्रवादीत पडलेल्या अभूतपूर्वी फुटीनंतरही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढण्याचा पवित्रा घेतला आणि आता त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. शरद पवार यांच्या मनाविरुद्ध जात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे अनेक आमदार उपस्थित होते. तसंच सुनिल तटकरे आणि अमोल कोल्हे यांच्या रुपाने दोन खासदारही उपस्थित होते. मात्र याच अमोल कोल्हे यांनी काही तासांतच आपली भूमिका बदलली असून मी शरद पवारांसोबत राहणार असल्याचं आज स्पष्ट केलं आहे.

अमोल कोल्हे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की, ‘जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुन। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है…पर दिल कभी नहीं,’ असं म्हणत मी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच अमोल कोल्हे यांनी यावेळी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील एक बोलका व्हिडिओही ट्वीट केला आहे. ‘सगळं विसरायचं, पण बापाला नाही विसरायचं. त्याला भेटल्याने, जवळ बसल्याने, मायेने विचारपूस केल्याने कणसाळतो, कुंभारतो. त्याला नाही विसरायचं,’ असं अमोल कोल्हे या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.

हेही वाचा” …शिंदे-फडणवीसांचे ‘कुराज्य’ लवकर जावो हीच जनतेची इच्छा, पटोलेंची टीका”

दरम्यान, साहेब सांगतील तेच धोरण आणि साहेब बांधतील तेच तोरण, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. खासदार कोल्हे यांनी दुसऱ्याच दिवशी भूमिका बदल्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

अजित पवार यांच्यासोबत जवळपास ४० आमदार आहेत, असं त्यांच्या गटाकडून सांगण्यात येत आहे. मात्र असं असलं तरी ही संख्या नक्की ३० आहे की त्यापेक्षा अधिक आहेत की कमी आहे, याची चाचपणी घेणे दोन्ही बाजूंनी सुरू आहे.