“अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल याची मला खात्री होती. अखेर आज भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतली. हा निर्णय स्वागतार्ह आहे. याचा मला आनंद आहे. एकदा त्यांनी माघार घेतली आहे त्यावर शंका किंवा इतर काही बोलणे योग्य नाही.” अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली आहे. (Sharad Pawar on Andheri East Election) मुळात ही पोटनिवडणूक आहे. रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे ही निवडणूक होत आहे. त्यांच्या पत्नीला जागा मिळणार अशी शक्यता होती. आधी निर्णय घेतला असता तर फायदा झाला असता का, तर निर्णय आता झाला किंवा आधी झाला, यापेक्षा निर्णय घेतला हे महत्त्वाचे आहे. असे निर्णय पटकन होत नसतात. त्याला काही ग्राऊंड वर्क करावे लागते.
उद्या वेळ आल्यावर आमची इच्छा आहे की महाविकास आघाडीमधील घटक (Mahavikas Aghadi) पक्षांनी एकत्र येऊन काम करावे. पण ही जरी इच्छा असली तरी जागेचे वाटप हा एक कळीचा मुद्दा असतो त्यावर किती एकवाक्यता होते यावर हे अवलंबून आहे. परंतु आमचा प्रयत्न राहील की यात एकवाक्यता आणून सामूहिकरीत्या लोकांसमोर येऊन जारी करावे.
आज दिल्लीतील सत्तेत असलेल्या घटकांना त्यांना भविष्यात पर्याय राहू शकेल असा एखादा पक्ष, संघटना किंवा शक्ती दिसत असल्यास त्यांच्यामागे काही ना काही लावून त्रास देण्यात येतो. केंद्रीय सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरून अशा प्रकारची भावना लोकांमध्ये झालेली आहे. असंही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुका आम्ही कोणीही पक्षाच्या वतीने लढवत नाही. (Sharad Pawar on Grampanchayat Elections in Maharashtra) यात कुठेही पक्षाचे चिन्ह अथवा पक्षाचे नाव नसते. या निडवणुका झाल्यावर आकड्यांचा जो दावा केला जातो त्याला अर्थ नाही. जिल्हा परिषद महत्त्वाची असते कारण ती पक्षाच्या नावावर लढली जाते. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर उमेदवाराची निवड करून कधीही लढवल्या जात नाहीत.
शरद पवारांचा गड कोणता हे मला अजून माहिती नाही. काही मतदारसंघात आपण अनेक वर्ष काम करतो, लोकांशी सुसंवाद ठेवतो. त्यामुळे लोक अनुकूल भूमिका घेतात. पण दुसऱ्या पक्षाला या ठिकाणी आपले स्थान मजबूत करावे असे वाटले तर त्यात काही गैर नाही. म्हणून बारामतीत केंद्रीय नेतृत्व यायला लागले तर त्यांचे आम्ही स्वागत करतो. केंद्रीय मंत्री या ठिकाणी आल्यानंतर येथील विकासाचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.
पक्षात संघटनात्मकरीत्या निवडणुका या लोकशाही पद्धतीने होतात ही जमेची बाजू आहे. काँग्रेस पक्षात अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जे निवडून येण्याची शक्यता आहे त्यात मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव दिसतेय. (Sharad Pawar talks about Congress Presidential Election) खर्गे व आम्ही सर्वजण संसदेत एकत्ररीत्या काम करतो आहोत. त्यामुळे अनेक वर्षांपासून संघटनेत काम करणारी व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय आम्हा सर्वांना आहे. त्यामुळे अशी व्यक्ती त्याठिकाणी आल्यास त्याचा परिणाम संघटनेच्या दृष्टीने चांगला होईल, असंही शरद पवार म्हणाले.