TOD Marathi

सांगली: जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या गटाला 17 पैकी तब्बल 10 जागांवर यश मिळालं आहे. खरंतर या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधक आणि रोहित पाटील यांच्यात प्रचंड शाब्दिक खडाजंगी बघायला मिळाली होती. त्यावेळी रोहित पाटील यांनी निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असं वक्तव्य भाषणादरम्यान केलं होतं. अखेर रोहित पाटील यांच्या नेतृत्वात कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. या विजयानंतर रोहित पाटील यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. रोहित आर आर पाटील यांनी समाज माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपल्या वडिलांची आज खूप आठवण येत असल्याचं सांगितलं.

रोहित पाटलांचं विरोधकांना नगरपंचायत जिंकल्यानंतर प्रत्युत्तर
“कवठेमहांकाळ नगरपंचायतीचा निकाल हा येत्या 19 तारखेला येईल. माझा बाप काढणाऱ्यांनो तुम्हाला निकालावेळी माझ्या बापाची आठवण नक्की होईल. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला सल्ले देणाऱ्यांनो तुम्ही काय कामं केली ते सांगा”, असं रोहित पाटील त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर आता रोहित पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिलं. “निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं होतं. माझ्या बापाची पुण्याई म्हणाले होते. पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही”, असं रोहित पाटील यांनी सांगितलं.

25 वर्षांचा होईपर्यंत कोणाला शिल्लक ठेवत नाही’
“सगळे पक्ष एकाबाजूला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला. तुम्ही म्हणाला 25 वर्षांच्या तरुणाला हरवण्यासाठी सगळे एकवटले आहेत. पण माझं वय 23 वर्षे आहे. 25 पर्यंत कोणाला शिल्लक ठेवत नाही.” हे रोहित पाटील यांचं प्रचारातलं हे भाषण चर्चेत होतं.

रोहित पाटलांमध्ये आर. आर. आबांची छवी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी दिवंगत गृहमंत्री आर.आर. आबांचं अकाली निधन होणं ही काळजाला चटका लावणारी घटना होती. आर. आर. आबा आज हयात जरी नसले तरी त्यांचा मुलगा 23 वर्षीय रोहित पाटील यांच्यामध्ये आर.आर. आबांची छवी जरुर बघायला मिळते. रोहित पाटील यांची बोलण्याची शैली देखील वडीलांसारखीच आहे. विशेष म्हणजे रोहित पाटील यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकण्या राजकारणात यशस्वी सुरुवात केली आहे. त्याचं जिवंत उदाहरण हे आजच्या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात दिसून आलं आहे.