TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 29 जुलै 2021 – राज्यात आरक्षणावरून गोंधळ सुरु आहे. या काळात केंद्र सरकारने यंदाच्या वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मेडिकल क्षेत्रातील शैक्षणिक प्रवेशांसाठी देशात यंदा ओबीसी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण दिले आहे. याचा फायदा सुमारे साडे पाच हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली माहिती अशी, या शैक्षणिक वर्षापासून अखिल भारतीय स्तरावर मेडिकलच्या प्रवेशासाठी ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण आणि आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आरक्षण लागू असेल, असा निर्णय घेतला आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे 5,550 विद्यार्थ्यांना होणार आहे. या आरक्षणातून एमबीबीएस, एमी, एमएस, डिप्लोमा, बीडीएस, एमडीएसच्या 2021-22 व यानंतरच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळणार आहे.

या दोन्ही घटकांना आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.