TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 29 जुलै 2021 – जगात करोनाने थैमान घातले असून त्याचा फटका भारताला देखील बसला आहे. देशात करोनाची दुसरी लाट आटोक्यात अली आहे, असे चित्र आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला आहे. करोनावर आळा घालण्यासाठी एकमेव उपाय तो म्हणजे लसीकरण करणे होय. देशामध्ये लसीकरण अधिक प्रमाणात सुरु आहे. मात्र, कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे नव्या किंमतीनुसारच सरकारला ऑर्डर देणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण करणे महत्वाचे आहे. त्यासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. भारतात तीन लसींना मजुंरी दिली आहे.

त्यात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिकव्ही या लशी देशात दिल्या जात आहेत. मात्र, या लशींच्या किंमतीत वाढ झाली आहे.

या लसींचे दर जानेवारी ते जुलै या कालावधीसाठी निश्चित केले होते. त्यात या दरांत वाढ केली आहे.

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या एका डोससाठी अनुक्रमे 200 आणि 206 रुपयांचा दर निश्चित केला होता. मात्र, सरकारसाठी असलेल्या या दरात वाढ केली आहे.

यापुढे कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीसाठी आता अनुक्रमे 205 आणि 215 रुपये सरकारला मोजावे लागणार आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. आता नव्या किंमतीनुसारच सरकारला ऑर्डर द्यावी लागणार आहे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.