TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 4 मे 2021 – महाराष्ट्रात ७ मे पर्यंत वादळी वार्‍यासह पाऊस पडणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत गारपीट, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सातत्याने होत असलेल्या पावसामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. महाराष्ट्र राज्यात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४१.२ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १६.५ अंश सेल्सिअस नोंदविले आहे.

मागील २४ तासात महाराष्ट्र राज्यात बुलढाणा ३०, चंद्रपूर १२, महाबळेश्वर २०, पुणे २७, पाषाण २२.५, पणजी ११, मार्मागोवा व परभणी ६, जालना ३, औरंगाबाद १.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महाबळेश्वर, औरंगाबाद, नागपूर, गोंदिया, पुणे येथे थोडा पाऊस झाला.

महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या पावसामुळे विदर्भाच्या बर्‍याच भागात कमाल तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झालीय. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तसेच किमान तापमानात किंचित घट झालीय.

राज्यात 5 मे रोजी राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच 6 आणि 7 मे रोजी संपूर्ण राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाटयाचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.