TOD Marathi

विजय डाकले यांची महाराष्ट्र शासनाच्या क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी निवड

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, पुणे, दि. 3 मे 2021 – पुण्यातील संगमवाडी येथील लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकाचे बांधकाम आणि इतर अनुषंगिक बाबी सनियंत्रित करण्याकरिता क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विजय डाकले यांची नियुक्‍ती केली आहे. विजय डाकले यांनी ही निवड केल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती आहे. त्या वर्षानिमित्त अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकासाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात संगमवाडी (जि. पुणे) येथील लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक विकसित करण्याच्या कामाचा समावेश केला आहे.

यानुसार संगमवाडी येथील लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकाचे बांधकाम आणि इतर अनुषंगिक बाबी सनियंत्रित करण्यासाठी विभागाच्या अशासकीय सदस्यांसह सुधारीत समिती गठीत केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार समितीच्या अध्यक्षपदी विजय डाकले यांची निवड केली आहे.

तसेच सदस्यपदी राजू धडे, निलेश वाघमारे. शांतीलाल मिसाळ, रवि पाटोळे, बाळासाहेब भांडे यांची निवड केली आहे. शासकीय सदस्य म्हणून विभागीय आयुक्‍त पुणे, पुणे महानगरपालिका आयुक्‍त, समाजकल्याण आयुक्‍त पुणे, पुणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी हे असणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सल्ल्यानुसार आणि खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्या मार्गदश॑नाखाली काम करणार आहेत. तसेच समाज एकत्रीकरणासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे निवडीनंतर विजय डाकले यांनी सांगितले आहे.