TOD Marathi

पुणे | MPSC टॉपर दर्शना पवार(Darshana Pawar) हत्या प्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. राहुलला (Rahul Handore) लग्नाला नकार दिल्यानेच त्याने दर्शनाला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिचा खून केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पोलिसांनी मुंबई येथील रेल्वे स्टेशन वरून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लहान पणापासून राहुल आणि दर्शना एकमेकांना ओळखत होते. राहुल याला दर्शनाशी लग्न देखील करायचे होते. राहुल हा पुण्यात डिलिव्हरीचे पार्ट टाईम काम करुन MPSC ची तयारी करत होता. दर्शना देखील MPSC ची तयारी करत होती. मात्र, दर्शना ही वनाधिकारी पदाची परीक्षा पास झाली होती. राहुलला दर्शनासोबत लग्न करायचे होते. मात्र, दर्शनाने त्याला लग्नाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर कदाचित राहुलने रागाच्या भरात तिचा खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला असून दर्शना ही अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. दर्शनासोबत ट्रेकिंगला गेलेला मित्र राहुल हंडोरे हा घटनेनंतर फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस राहुल हंडोरेच्या मागावर होती. पुणे पोलिसांची पाच पथकं राहुल हंडोरेचा शोध घेत होती. राहुल हंडोरे हा अनेक राज्यांमध्ये फिरत होता. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा असा त्याचा प्रवास सुरु होता. मात्र,अखेर पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस करुन त्याला मुंबईतून अटक केली.