TOD Marathi

सोलापूर | तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता आषाढी यात्रेचे औचित्य साधून ते आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह २८ जून रोजी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. या वेळी केसीआर हे विठ्ठल मंदिरासह चंद्रभागेच्या वाळवंटी जमलेल्या लाखो वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री केसीआर यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह शंभरपेक्षा अधिक आमदार आणि वरिष्ठ अधिकारी येत असून, त्यांच्यासाठी सोलापुरात बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोनशे कक्ष आरक्षित केले जात आहेत. याबाबतची माहिती काँग्रेस पक्षातून बीआरएस पक्षात गेलेले माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी दिली. आषाढी यात्रेत केसीआर यांची पंढरपुरमध्ये वाखरी येथे आषाढी एकादशीच्या अगोदर होणारा रिंगण सोहळाही पाहण्याची इच्छा आहे. त्याची जबाबदारी पंढरपूरचे भगीरथ भालके यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र आणि मूळ राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे केसीआर यांच्या संपर्कात आहेत.

हेही वाचा…म्हणून त्याने दर्शनाला संपवलं, राहुल हंडोरेने सांगितलं हत्येचं खरं कारण”

आषाढी एकादशीपूर्वी २७ जूनला सायंकाळी केसीआर मंत्रिमंडळासह सोलापुरात दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी (२८ जून) केसीआर पंढरपुरात जाणार आहेत.  आषाढी एकादशी यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र व अन्य राज्यांतून भाविक आणि वारकऱ्यांची मांदियाळी पंढरपुरात जमते. परप्रांतातील काही राजकीय नेतेही पंढरीत येतात. यात यंदा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाची भर पडणार आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवरील भार वाढणार आहे.