मुंबई | मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, पुण्यासह बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हे क्षेत्र उत्तर ओडिशा आणि झारखंडच्या दिशेने प्रवास करत आहे. तसंच महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मान्सून सक्रिय राहणार असून मुंबई परिसरात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह पालघर, ठाणे या जिल्ह्यांसाठी मंगळवारी आणि बुधवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रायगडसाठी पुढील चारही दिवस, तर रत्नागिरीसाठी मंगळवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तसंच सिंधुदुर्गात मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मध्य महाराष्ट्रातही पुढील ४८ तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने शुक्रवारपर्यंत (३० जून) शहर आणि घाटमाथ्यावर रोज पाऊस हजेरी लावणार आहे. सोमवारी आकाश दिवसभर ढगाळ राहणार असून, हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारनंतर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार आहे. पावसाचा जोर कायम वाढल्यास पुण्यातील जून महिन्याची सरासरी आठवडाभरात ओलांडण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या विविध भागांमध्ये रविवारी सकाळी पावसाने जोरदार हरेजी लावली. त्यानंतर मात्र जोर कमी झाला. दुपारच्या सुमारास सांताक्रूझ, खार, जुहू, वर्सोवा या भागात संततधार पुस पडला. मात्र या पावसाचा जोर फारसा नव्हता. मुंबईत सांताक्रूझ येथे रविवारी सकाळी ८.३०पासून सायं. ५.३०पर्यंत केवळ १७.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर, कुलाबा येथे ३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी दिवसभर पडलेल्या पावसाचा परिणाम म्हणून मुंबईच्या कमाल तापमानात शनिवारपेक्षा घट नोंदली गेली.